सिंदखेडराजा प्रतिनिधी :
सिंदखेडराजा तालुक्यातील किनगाव राजा येथील जिल्हा परिषद शाळेत सोमवारी भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. शाळा समितीचे अध्यक्ष श्री इसाक कुरेशी यांच्या हस्ते ध्वजारोहण फटाक्यांची आतषबाजी करत करण्यात आले.
महापुरुषांचे पूजन
ध्वजारोहणानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन शाळा समिती अध्यक्ष इसाक कुरेशी यांच्या हस्ते करण्यात आले, तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच प्रकाश मुंढे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रभातफेरीतून जागरूकता
प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी संपूर्ण गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. लहान चिमुकल्या विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन देशभक्तीच्या घोषा दिल्या, ज्यामुळे गाव परिसर दुमदुमून गेला. प्रभातफेरीमुळे नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि देशभक्तीची भावना अधिक बळकट झाली.
विद्यार्थ्यांचे सादरीकरण
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे, नृत्य व गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. चिमुकल्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले आणि रोख बक्षिसे देऊन त्यांना प्रोत्साहन दिले.
वाढदिवसाच्या निमित्ताने गोड सरप्राईज
औचित्य साधून नितीन सानप यांनी आपले चिरंजीव ओम सानप यांच्या २६ जानेवारी रोजीच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना बिस्किटांचे वाटप केले. तसेच शाळा समिती अध्यक्ष इसाक कुरेशी यांनी विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप करून आनंद द्विगुणित केला.
ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
कार्यक्रमात किनगाव राजा येथील अंगणवाडीतील मुले-मुली, अंगणवाडी सेविका व मदतनीस, पालक वर्ग तसेच महिला व पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळा समितीचे उपाध्यक्ष व शालेय शिक्षण समिती सदस्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिक वाढली.
किनगाव राजा येथील जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
0
9
4
9
8
0
Users Today : 11
Leave a comment