डोणगाव प्रतिनिधी :
शिवसेना संस्थापक वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त डोणगाव नगरीत आयोजित जनसंवाद सभेत बोलताना केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी “जनतेच्या विश्वासाला भविष्यात कधीही तडा जाऊ देणार नाही” असा ठाम विश्वास व्यक्त केला.
दि. २४ जानेवारी रोजी स्थानिक आठवडी बाजार परिसरात ही जनसंवाद सभा पार पडली. या वेळी माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर, माजी पंचायत समिती सभापती दिलीपबाप्पू देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
सभेची सुरुवात वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्रास्ताविक माजी सभापती राजेंद्र पळसकर यांनी केले. त्यांनी डोणगाव जिल्हा परिषद सर्कलमधील विविध समस्या उपस्थित करून सभेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.
यावेळी माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी विरोधकांवर टीका करताना सांगितले की, “माझ्या कार्यकाळात मंजूर झालेल्या विकासकामांचे श्रेय सध्याचे आमदार घेत आहेत. त्यांनी एका वर्षात काय काम केले, किती निधी आणला हे जनतेसमोर मांडावे. रखडलेली विकासकामे पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे. मीच तुमच्या मनातील आमदार आहे.”
सभेदरम्यान अनेक युवकांनी ना. प्रतापराव जाधव यांच्यावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी ना. प्रतापराव जाधव म्हणाले,
“सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला तुम्ही तीन वेळा आमदार आणि चार वेळा खासदार केले. तुमच्या आशीर्वादामुळेच मला केंद्रात मंत्रीपद मिळाले. हा उपकार सात जन्मातही फेडू शकणार नाही. यश-अपयश येत राहतात, मात्र कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे. जनतेच्या प्रश्नांसाठी मी सदैव तुमच्यासोबत आहे.”
या कार्यक्रमास शिवसेना तालुका प्रमुख सुरेशतात्या वाळुकर, समाधान साबळे, माजी सरपंच संजय पाटील, आशा आखाडे, सरपंच शिवचरण आखाडे, डॉ. गजानन उल्हामाले, मधुकर घिरके, गोपाल पाखरे, विजय जागृत, एकनाथ खराट, डिंगावर वानखेडे यांच्यासह डोणगाव व अंजनी जि.प. सर्कलमधील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेचे सूत्रसंचालन शहरप्रमुख जयचंद बाठीया यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. गजानन उल्हामाले यांनी मानले.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या सभेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही” – केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव
0
9
4
9
8
0
Users Today : 11
Leave a comment