मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या गडकिल्ल्यांचा इतिहास तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी युवकांनी प्रत्यक्ष किल्ल्यांना भेटी देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिवदुर्ग अभ्यासक आप्पासाहेब परब यांनी केले.
मालाड (पू.), कुरार व्हिलेजमधील श्री समर्थ पुस्तकालय व लोक मान्य वाचनालय यांच्या वतीने आयोजित सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार प्रकाश सावंत यांच्या हस्ते आप्पासाहेब परब यांना ‘असीम कर्तृत्व जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व रोख ११ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
श्री समर्थ पुस्तकालय व लोकमान्य वाचनालयाने १०५ वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण केली असून, स्थानिक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व वैचारिक जडणघडणीत संस्थेने मोलाचे योगदान दिले आहे. यानिमित्त कै. वि. ग. कानिटकर शिष्यवृत्ती, कै. दत्तात्रय शंकर जोशी व कै. निर्मला दत्तात्रय जोशी शिष्यवृत्तीअंतर्गत प्रत्येकी एक हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन २४ गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना आप्पासाहेब परब म्हणाले की, शिवदुर्ग हा महाराष्ट्राचा अमूल्य ऐतिहासिक ठेवा असून, तो जतन करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने माहितीपट, पुस्तके
तसेच छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून व्यापक प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रकाश सावंत यांनी सांगितले की, संविधानाला अभिप्रेत असलेली सुसंस्कृत व विवेकी तरुण पिढी घडवण्यात पुस्तकालये व वाचनालयांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगून, दानशूर व्यक्तींनी अशा संस्थांना भरीव आर्थिक सहाय्य करावे, असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहकार्यवाह अनघा साळकर यांनी केले, तर मुख्य कार्यवाह प्रवीण मालोडकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्यवाह लीना कर्णिक, नितीन जाधव, मुख्य कोषाध्यक्ष राजेंद्र डोंगरे, विश्वस्त संगीता मेनन तसेच कर्मचारीवृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.
ज्येष्ठ शिवदुर्ग अभ्यासक आप्पासाहेब परब यांना जीवनगौरव पुरस्कार
0
9
4
9
7
5
Users Today : 6
Leave a comment