शेंदूर्जन, दि. २८ (प्रतिनिधी) —
शेंदूर्जन येथे स्थानिक ग्रामपंचायत कार्यालय व विविध संस्थांच्या वतीने देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने संपूर्ण गावाची स्वच्छता करून आकर्षक सजावट करण्यात आली होती.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. ग्रामविकास अधिकारी प्रकाश आढाव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यानंतर त्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले, यावेळी उपस्थित नागरिक व कर्मचारी यांनी सामूहिक सहभाग नोंदविला.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या थोर स्वातंत्र्यवीरांच्या शिलालेखाचे पूजन माजी कॅप्टन सुभाष कंकाळ यांच्या हस्ते करण्यात आले व त्यांनी सलामी दिली. ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण सरपंच शोभाताई शिंगणे यांच्या हस्ते पार पडले. तसेच शेंदूर्जन नगरीच्या मुख्य प्रवेशद्वारावरील ध्वजारोहणाचा मान उपसरपंच नकुल शिंगणे यांना देण्यात आला.
जिल्हा परिषद शाळेत दिनकरराव देशमुख, बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेत व्यवस्थापक संजय वायाळ, शिवप्रसाद धनराज चौधरी शाळेत संतोषराव शिंगणे तसेच वसंतराव नाईक विद्यालयात सुधाकर शिंगणे यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामविकास अधिकारी प्रकाश आढाव यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश शिंगणे, भगवान जाधव, विष्णू डवके, प्रकाश शिंगणे, राजू शिंदे व पवन गवई या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Users Today : 7