मराठा समाजासाठी न्यायालयाऐवजी संवादाचा नवा मार्ग मराठा पंचायत समितीची स्थापना – छत्रपती शिवराय प्रतिष्ठानचा पुढाकार

Khozmaster
2 Min Read

मलकापूर प्रतिनिधी :
लग्नानंतर पती-पत्नीमध्ये उद्भवणारे वाद थेट न्यायालयात न नेता संवाद, समजूत आणि समुपदेशनाच्या माध्यमातून मिटवता यावेत, या सामाजिक उद्देशाने मलकापूर येथील छत्रपती शिवराय प्रतिष्ठान आणि अकोट येथील संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ यांच्या संयुक्त पुढाकारातून *‘मराठा पंचायत समिती’*ची स्थापना करण्यात आली आहे.
आज अनेक कुटुंबे कौटुंबिक वादांमुळे वर्षानुवर्षे न्यायालयात अडकलेली दिसतात. खटल्यांमुळे वेळ, पैसा आणि मानसिक शांतता खर्ची पडते. अनेकदा नाती तुटतात, मात्र न्याय लांबतो. या परिस्थितीला सकारात्मक पर्याय म्हणून मराठा पंचायत समितीची निर्मिती करण्यात आली आहे.
या समितीच्या अध्यक्षपदी दिलीप देशमुख, तर सचिवपदी अॅड. साहेबराव एस. मोरे यांची निवड करण्यात आली आहे.
समितीमध्ये हरिभाऊ पाटील (भगत), ज्ञानदेवराव हिवाळे (गुरुजी), प्रकाश पाटील, सदाशिव भोईटे, सोपान शेलकर, निवृत्ती फरपट यांचा समावेश आहे. समाजातील अनुभवी, विश्वासार्ह आणि संवेदनशील व्यक्तींना या समितीत स्थान देण्यात आले आहे.
वादग्रस्त दांपत्यांसाठी आवाहन
पती-पत्नीमध्ये वाद निर्माण झाल्यास न्यायालयाचा मार्ग अवलंबण्यापूर्वी मराठा पंचायत समितीकडे अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अर्ज शिवराय मंगल कार्यालयात निवृत्ती फरपट यांच्याकडे विहित नमुन्यात सादर करता येणार आहेत. त्यानंतर समिती समुपदेशन व मध्यस्थीद्वारे समतोल तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहे.
पहिल्याच दिवशी यशस्वी तोडगा
विशेष म्हणजे, समितीच्या स्थापनेच्या दिवशीच एका पती-पत्नीतील वाद यशस्वीरित्या मिटवण्यात आला. दोन्ही पक्षांनी समंजस संवाद साधत तोडगा काढल्याने हा उपक्रम समाजासाठी आशादायी ठरत आहे.
हा उपक्रम केवळ वाद मिटवणारा नसून, संवाद, संयम, कुटुंबसंस्कार आणि सामाजिक सलोखा वाढवणारा एक नवा मार्ग ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

0 9 4 9 7 5
Users Today : 6
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *