निरोगी जीवनशैलीचा संदेश; शेगाव आरोग्य मेळाव्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

KHOZ MASTER
2 Min Read

शेगाव प्रतिनिधी :

लहानपणापासून नियमित व्यायाम, योगाभ्यास आणि संतुलित आहाराचा अवलंब केल्यास व्यक्ती निरोगी राहू शकते, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री Prataprao Jadhav यांनी केले. शेगाव येथील विसावा मैदानावर आयुष मंत्रालयातर्फे आयोजित चार दिवसीय आरोग्य मेळाव्यात ते बोलत होते.
मुलांनी जंकफूड, पिझ्झा तसेच रासायनिक पेयांपासून दूर राहून आरोग्याबाबत सजग राहावे, असे सांगताना त्यांनी ‘आरोग्य हीच खरी संपत्ती आहे’ हा संदेश दिला. निरोगी नागरिक हीच राष्ट्राची खरी ताकद असून, नागरिकांचे आरोग्य सुदृढ असेल तर देशाच्या विकासाला गती मिळते, असेही त्यांनी नमूद केले.
आज २७ फेब्रुवारी रोजी आयोजित विशेष सत्रात आयुर्वेदिक बाल आरोग्य तज्ञ Maitreyi Saurabh Limaye यांनी शाळकरी विद्यार्थ्यांना पोषण आहार व आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केले. योग्य आहार, नियमित दिनचर्या आणि व्यायामाचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.
राज्यमंत्री जाधव पुढे म्हणाले की, धावपळीच्या जीवनशैलीमुळे तरुण वर्ग स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत आहे. अनियमित दिनचर्या, अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे जीवनशैलीजन्य आजार वाढत असून, त्यावर उपचारासाठी उत्पन्नाचा मोठा भाग खर्च करावा लागतो. त्यामुळे तरुणांनी वेळेचे योग्य नियोजन करून नियमित व्यायाम, योग आणि संतुलित आहार यांचा अवलंब करणे अत्यावश्यक आहे.
आरोग्यदायी सवयी लहानपणापासूनच जोपासल्यास भविष्यातील अनेक व्याधींवर नियंत्रण मिळविता येते. कुटुंब, शाळा आणि समाज यांनी सकारात्मक भूमिका घेत जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमास विविध शाळांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 9 4 6 2 0
Users Today : 34
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *