जाफराबाद प्रतिनिधी :
येथील सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेच्या संवर्धन व प्रचाराची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ कवी व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते V. V. Shirwadkar (कुसुमाग्रज) यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रमेश देशमुख होते. उपप्राचार्य प्रो. डॉ. सुनील मेढे, उपप्राचार्य डॉ. श्याम सर्जे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य विनोद हिवराळे तसेच प्रमुख वक्ते प्रो. डॉ. विजय पाटील यांची उपस्थिती लाभली.
प्रमुख वक्ते प्रो. डॉ. विजय पाटील यांनी मराठी भाषेचे वैभव, तिचा समृद्ध इतिहास आणि आधुनिक काळातील महत्त्व यावर मार्गदर्शन केले. “मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून ती आपल्या संस्कृतीची ओळख आहे,” असे त्यांनी प्रतिपादन केले. मराठीच्या प्राचीन गद्य-पद्य परंपरेचा तसेच विविध साहित्य पुरस्कारांचा आढावा घेत त्यांनी मराठीला प्राप्त झालेल्या अभिजात भाषेच्या दर्जाबद्दल आनंद व्यक्त केला.
परकीय भाषांच्या प्रभावाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, मराठी ही सशक्त भाषा असून कितीही आक्रमणे झाली तरी ती कधीच नामशेष होणार नाही. उलट नव्या शब्दांच्या समावेशामुळे तिचा शब्दकोश अधिक समृद्ध होईल.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. रमेश देशमुख यांनी विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात मराठीचा वापर वाढवून तिचे जतन करावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिवाजी जगतवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. अनिल वैद्य यांनी मानले.
कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयात मराठीच्या जतन व संवर्धनाचा संकल्प करण्यात आला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
Users Today : 34