मलकापूरमध्ये पाणीटंचाई व निकृष्ट कामांवरून नागरिकांचा संताप

KHOZ MASTER
2 Min Read

मलकापूर प्रतिनिधी :

शहरातील स्थानिक स्वराज्य संस्था पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. निवडणुकीच्या काळात “हम वादे नही, इरादे लेकर आये है” असा दमदार नारा देत नागरिकांना मूलभूत सुविधा सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र सध्याची परिस्थिती पाहता नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पाणीपुरवठा अनियमित; नागरिक त्रस्त
प्रशासक राजवटीत शहराला सहा ते सात दिवसांतून नियमित पाणीपुरवठा होत असल्याचे सांगितले जाते. मात्र लोकप्रतिनिधी सत्तेत आल्यानंतर हा कालावधी दहा ते बारा दिवसांवर गेल्याची तक्रार शहरवासीयांकडून होत आहे. परिणामी महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे.
“पाणीटंचाईस जबाबदार कोण — लोकप्रतिनिधी की प्रशासन?” असा थेट सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
प्रभाग क्रमांक ९ मध्ये निकृष्ट कामाचा आरोप
नगर परिषद मलकापूर अंतर्गत प्रभाग क्रमांक ९ मध्ये अवघ्या सहा महिन्यांत गटारीवरील सिमेंटचे ढापे तुटल्याची घटना समोर आली आहे. एवढ्या कमी कालावधीत काम निकृष्ट दर्जाचे ठरत असेल, तर संबंधित अभियंत्यांनी बिल मंजूर कसे केले? ठेकेदारावर दंडात्मक कारवाई का झाली नाही? असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
प्रभागात “तेरी भी चुप, मेरी भी चुप” अशी उपरोधिक चर्चा रंगत असून काही स्तरावर ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे प्रयत्न होत असल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू आहे.
स्वतंत्र दालनावरून राजकीय रस्सीखेच
मूलभूत सुविधांना प्राधान्य देणे अपेक्षित असताना स्वतंत्र दालनाच्या मुद्द्यावरून राजकीय रस्सीखेच अधिक दिसून येत असल्याची चर्चा आहे. वाढीव करआकारणीमुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिकदृष्ट्या होरपळत असल्याची भावना व्यक्त होत आहे. पूर्वी अवास्तव करआकारणीचे आरोप झाले होते; त्यानंतरही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही.
पारदर्शकतेची मागणी
सध्याची परिस्थिती ही केवळ सुरुवात असून पुढील पाच वर्षांत शहराचा विकास कोणत्या दिशेने जाईल, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
“दालनासाठी नव्हे, तर जनतेच्या हितासाठी भांडावे,” अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कारभारात पारदर्शकता, दर्जेदार कामे आणि नियमित पाणीपुरवठा यासाठी नागरिकांकडून ठोस पावले उचलण्याची मागणी होत आहे.

0 9 4 6 2 0
Users Today : 34
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *