मलकापूर : घिर्णी रस्त्यावर शेकडो झाडांची कत्तल; वीज वितरण कंपनीविरोधात संताप

KHOZ MASTER
2 Min Read

मलकापूर प्रतिनिधी :

शहरातील घिर्णी रस्त्यावर रुक्मिणी नगर ते पुढे सुमारे अडीच किलोमीटर अंतरापर्यंत सात-आठ वर्षांपूर्वी शासनाच्या वतीने लावण्यात आलेली पिंपळ, लिंब, वड, गुलमोहर यांसारखी विविध जातींची झाडे आता डेरेदार झाली होती. मात्र, विद्युत खांब उभारणीच्या कामादरम्यान वीज वितरण कंपनीकडून शेकडो झाडांची कत्तल करण्यात आल्याचा आरोप होत असून पर्यावरण प्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
भाविकांसाठी सावलीचा आधार
घिर्णी येथील Sant Gajanan Maharaj Temple Ghirdni येथे दर गुरुवारी मोठ्या संख्येने भाविक पायदळ वारीने जातात. या मार्गावरील झाडांची सावली भाविकांसाठी दिलासादायक ठरत होती. स्थानिक पर्यावरण प्रेमींनी स्वतःच्या प्रयत्नांतून उन्हातान्हात पाणी घालून ही झाडे जपली होती.
परवानगीचा प्रश्न अनुत्तरित
विद्युत वाहिन्यांसाठी खांब उभारणी करताना झाडे तोडण्यासाठी अधिकृत परवानगी घेण्यात आली होती का?
वन विभागाची लेखी मंजुरी होती का?
नगरपालिकेची परवानगी घेण्यात आली का?
की नियमांना हरताळ फासून कारवाई झाली?
या प्रश्नांची उत्तरे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.
पर्यावरण प्रेमींची भूमिका
मलकापूर ते घिर्णी मार्गावर शासनाने हजारो रुपये खर्च करून ही झाडे लावली होती. भर उन्हाळ्यात चार-पाच किलोमीटरवरून पाण्याच्या बाटल्या नेऊन झाडांना पाणी घालून त्यांची जोपासना करण्यात आली होती. त्यामुळे या झाडांशी भावनिक नाते जडल्याचे पर्यावरण प्रेमींनी सांगितले.
ज्येष्ठ विधीज्ञ व पर्यावरण प्रेमी नागरिक अॅड. योगेश पाटील यांनी सांगितले की,
“ही अमानुष वृक्षतोड पर्यावरण प्रेमींच्या भावना दुखावणारी आहे. संपूर्ण प्रकरणाची शासकीय पातळीवर गंभीर चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी. अन्यथा लोकशाही मार्गाने जनलढा उभारून कायदेशीर पर्याय अवलंबावा लागेल.”
चौकशी व कारवाईची मागणी
सदर प्रकरणात अवैध वृक्षतोडीची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी एकमुखी मागणी निसर्गप्रेमी नागरिकांकडून होत आहे.

0 9 4 6 2 0
Users Today : 34
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *