जळगाव जामोद प्रतिनिधी :
Greater Bombay Science Teachers Association (GBST Association) यांच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर आयोजित ‘डॉक्टर बालवैज्ञानिक’ परीक्षेत स्थानिक दि न्यू इरा हायस्कूल येथील इयत्ता सहावीचा विद्यार्थी शर्विल अनिल भगत याने उत्तुंग यश संपादन करत अंतिम फेरीत मजल मारली आहे.
राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत इयत्ता सहावीमधून सुमारे १,०४,००० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी केवळ ४२९ विद्यार्थ्यांची अंतिम फेरीसाठी निवड झाली असून, त्यात शर्विलचा समावेश आहे.
संशोधन विषय : रासायनिक व सेंद्रिय शेतीची तुलना
पुढील फेरीसाठी शर्विलने “Comparison Between Chemical and Organic Farming” हा विषय निवडला आहे. या संशोधन निबंधासाठी तो शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या अनुभवांच्या आधारे रासायनिक व सेंद्रिय शेतीतील फायदे-तोटे, खर्च, उत्पादनाचा वेग आणि बाजारपेठ यांची माहिती संकलित करणार आहे. हा शोध निबंध इंग्रजी माध्यमातून सादर केला जाणार आहे.
यानंतर त्याला दोन मुलाखती द्याव्या लागणार असून सर्व पुढील फेऱ्या मुंबई येथे होणार आहेत. त्याची पुढील परीक्षा १५ मार्च रोजी मुंबई येथे होणार आहे.
दि न्यू इरा हायस्कूलचा मुलाखतीसाठी पात्र ठरलेला हा आतापर्यंतचा पहिलाच विद्यार्थी ठरला असून, शर्विलच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Users Today : 23