बुलढाणा
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी पत्रकारांना “एकाच गाडीत फिरा” असा दिलेला सल्ला सध्या राजकीय आणि माध्यम क्षेत्रात चर्चेचा विषय ठरत आहे. वरकरणी हा सल्ला इंधन बचत आणि परस्परांतील मैत्री वृद्धिंगत करण्यासाठी दिला असल्याचे दिसत असले, तरी त्यामागे काही राजकीय संदेश दडला आहे का, याबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे.
राजकारणात प्रत्येक विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जातात. त्यामुळे “एकाच गाडीत” या सूचनेवरून आता माध्यमविश्वातही चर्चांना उधाण आले आहे. काही जाणकारांच्या मते, पत्रकार जर एकाच गाडीत प्रवास करू लागले, तर बातम्यांचाही ‘कॉमन रूट’ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
निवडणुकांची चाहूल लागल्यानंतर राजकारणी आणि माध्यम प्रतिनिधींमधील जवळीक वाढताना दिसते. कुणी पत्रकारांसाठी चहापानाचे आयोजन करते, कुणी दौऱ्यांमध्ये त्यांना सोबत घेऊन जाते, तर कुणी थेट एकाच वाहनातून प्रवास करण्याचा सल्ला देते. त्यामुळे प्रतापराव जाधव यांच्या वक्तव्यामागे केवळ इंधन बचतीचा हेतू आहे की संवादाचे ‘स्टिअरिंग’ एका दिशेने वळवण्याचा प्रयत्न, यावर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, या वक्तव्यावरून सोशल मीडियावरही विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काहींनी या सल्ल्याला व्यवहार्य आणि पर्यावरणपूरक म्हटले आहे, तर काहींनी त्यामागे सूचक राजकीय अर्थ शोधण्यास सुरुवात केली आहे.
एकूणच, प्रतापराव जाधव यांच्या “एकाच गाडी”च्या सल्ल्याने पत्रकार आणि राजकारणातील संबंधांबाबत नव्याने चर्चा सुरू झाली असून, हा विषय पुढील काळात आणखी रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Users Today : 23