खरीपपूर्वी खत खरेदीला वेग; चिखली तालुक्यात डीएपीला मोठी मागणी युद्धजन्य परिस्थिती आणि बाजारातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून आगाऊ साठवणूक

KHOZ MASTER
2 Min Read

चिखली 
मध्य-पूर्व आशियातील वाढती युद्धजन्य परिस्थिती, आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चितता तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करण्याबाबत केलेले आवाहन या पार्श्वभूमीवर चिखली तालुक्यात खरीप हंगामापूर्वीच खत खरेदीला मोठा वेग आला आहे. विशेषतः डीएपी आणि संयुक्त खतांच्या विक्रीत एप्रिल महिन्यात लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली असून, शेतकरी आगाऊ खत खरेदी करून साठा करण्याकडे वळले आहेत.

खरीप हंगाम तोंडावर आल्याने तालुक्यातील शेतकरी सध्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. चिखली तालुक्याचे एकूण १ लाख १३ हजार ६९६ हेक्टर भौगोलिक क्षेत्र असून त्यापैकी ९० हजार ६९२ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. यामध्ये सोयाबीन हे प्रमुख पीक असून तब्बल ७३ हजार ४५६ हेक्टरावर त्याची पेरणी अपेक्षित आहे. तुरीचे क्षेत्र ११ हजार ८७८ हेक्टर इतके राहण्याची शक्यता आहे.

खतांची वाढती मागणी लक्षात घेऊन कृषी विभागाने खरीप हंगामासाठी आवश्यक नियोजन पूर्ण केले आहे. तालुक्यातील ६५ अधिकृत विक्री केंद्रांवर खत विक्री सुरू असून, सध्या खतसाठा समाधानकारक असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

कृषी विभागाच्या माहितीनुसार खरीप हंगामासाठी तालुक्यात एकूण १८ हजार ३४ मेट्रिक टन खतांची मागणी आहे. त्यापैकी मे अखेरपर्यंत सुमारे ११ हजार १२५ मेट्रिक टन खतांचा पुरवठा अपेक्षित आहे. डीएपी, युरिया, संयुक्त खते, सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश आणि टीएसपी खतांची उपलब्धता टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येत आहे.

दरम्यान, डीएपी खताला शेतकऱ्यांकडून सर्वाधिक मागणी असली तरी कृषी विभागाने पर्यायी खतांच्या वापरावर भर देण्याचे आवाहन केले आहे. ट्रिपल सुपर फॉस्फेट आणि युरियाचा संतुलित वापर केल्यास डीएपीइतकेच नत्र व स्फुरद उपलब्ध होते, असे कृषी तज्ज्ञांनी सांगितले. युरिया फॉस्फेट खतामध्ये गंधक उपलब्ध होत असल्याने सोयाबीनसारख्या तेलबिया पिकांसाठी ते अधिक उपयुक्त ठरत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

तालुका कृषी अधिकारी अशोक सुरडकर यांनी शेतकऱ्यांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. “तालुक्यात खतांचा पुरवठा सुरळीत सुरू असून खरीप हंगामासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. कोणत्याही प्रकारची घाईगडबड किंवा अनावश्यक साठेबाजी करू नये. अधिकृत विक्रेत्याकडूनच खत खरेदी करून पक्के बिल घ्यावे,” असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खतांच्या वाढत्या मागणीमुळे बाजारात हालचालींना वेग आला असून, पुढील काही दिवसांत खत विक्रीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

0 9 7 2 2 5
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *