मुंबई :
महाराष्ट्रात विनापरवाना सुरू असलेल्या बाइक टॅक्सी सेवांविरोधात राज्य परिवहन विभागाने कठोर भूमिका घेतली असून Rapido आणि Ola यांसारख्या कंपन्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीर बनल्याने संबंधित कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
राज्यात अधिकृत परवानगीशिवाय बाइक टॅक्सी सेवा सुरू असल्यामुळे कायदेशीर तसेच सुरक्षाविषयक अनेक प्रश्न निर्माण झाले होते. प्रवाशांच्या विमा संरक्षणाचा अभाव, चालकांची पडताळणी आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन या मुद्द्यांवरून परिवहन विभागाने आक्षेप नोंदवला आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभरातील हजारो बाइक टॅक्सी चालक आणि सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिवहन विभागाने पोलीस आणि सायबर विभागालाही विशेष सूचना देत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
प्रवाशांची सुरक्षितता, विमा संरक्षण आणि वैध परवानगी या बाबींना प्राधान्य देत ही कारवाई करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, राज्यात बाइक टॅक्सी सेवांचे भवितव्य काय असणार, याकडे नागरिकांसह संबंधित कंपन्यांचेही लक्ष लागले आहे.
वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, शहरांमध्ये स्वस्त आणि जलद प्रवासाचा पर्याय म्हणून बाइक टॅक्सी सेवांना मोठी मागणी आहे. मात्र, त्यासाठी स्पष्ट नियमावली आणि परवानगी प्रक्रिया आवश्यक असल्याचे मतही व्यक्त केले जात आहे.
Users Today : 6