सेनगांव परमेश्वर सावंत,- शहर प्रतिनिधि सेनगांव : जागतिक स्तरावरील अव्वल दर्जाच्या मानल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या मैसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विद्यापीठात सेनगाव तालुक्यातील कहाकर येथील शेतकरी कुटुंबातील आकाश पोपळघट या विद्यार्थ्याची निवड झाली. दरवर्षी जगातील ४० विद्यार्थ्यांनाच या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळतो. यावर्षी भारतातून केवळ आकाशची निवड झाली आहे. कहाकर येथील आकाशचे वडील गजानन पोपळघट हे व्यवसायाने शेतकरी. तर आई लक्ष्मी या गृहिणी आहेत. लहानपणापासूनच आकाश अभ्यासात अव्वल. गावातच जि.प. शाळेत चौथीपर्यंत शिकला. नंतर रिसोड व त्यानंतर राजस्थानमधील कोटा येथे शिक्षण घेतले. येथे आकाशच्या ज्ञानकक्षेला आकाशही ठेंगणे पडू लागले. विविध अभ्यासक्रमांची माहिती मिळाली. सॅट, ऑलिम्पियाडसारख्या अनेक स्पर्धा परीक्षा व जीईई मेन्स, अॅडव्हान्सची तयारी केली की थेट एमआयटीला अर्ज करता येतो, हे कळाले. त्यासाठी रोज अठरा तास अभ्यास करून या परीक्षांमध्ये तो अव्वल यश मिळवित गेला.त्यानंतर एमआयटीसाठी अर्ज केला. त्यांचीही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तो प्रवेशास पात्र ठरल्याचे पत्र मिळाले आहे. त्यासाठीच्या शिष्यवृत्तीलाही तो पात्र ठरला. त्यामुळे शिक्षणावरचा काही भार हलका होणार आहे. मात्र एअरोस्पेश आणि फिजिक्समधील येथील अभ्यासक्रमानंतर चांगल्या पगाराचा मोठा हुद्दा मिळणार हे नक्की आहे. त्यामुळे त्याचा ठिकठिकाणी सत्कार होत आहे. त्याला सध्या लागणाऱ्या खर्चासाठी मदत म्हणून काही शिक्षक, पतसंस्था व इतरांनीही मदतीचा हात पुढे केला आहे.