वाशिम प्रतिनिधी / प्रदिप पट्टेबहादुर) वाशीम : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 193 व्या जयंती महोत्सवानिमित्त दि. 3 जानेवारी 2024 रोजी शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक चौकातून सकाळी 9 वाजता पायदळ सुरू होणाऱ्या भव्य शोभायात्रेत शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सार्वजनिक सावित्रीबाई फुले जयंती महोत्सव समितीच्या वतीने एका पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
स्त्रियांसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या जगातील पहिल्या स्त्री शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती उत्सव दरवर्षी शहरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षीही आयोजन समितीने जयत्त तयारी केली आहे. या उत्सवानिमित्त दि. 25 डिसेंबर रोजी सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना शोभायात्रेच्या प्रारंभी बक्षीस वितरण केले जाणार आहे. जयंती उत्सवानिमित्त शहरात ठिकठिकाणी बॅनर्स व कटआउट लागले आहेत.
यावर्षी शोभा यात्रेचे भव्य स्वरूप दिसणार असून यामध्ये महिलांचे भजनी मंडळ, शाहीरी पोवाडे , पथनाट्य सादर होणार आहे.
ही शोभायात्रा सकाळी नऊ वाजता क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक चौकातून सुरू होणार असून ती शहरातील देवपेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, काटीवेश, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौक, गणेश पेठ, दंडे चौक, चंडिकावेस येथून पुन्हा क्रांतीसुर्य महात्मा फुले स्मारक चौक येथे शोभायात्रेचा समारोप होईल. या शोभायात्रेच्या समोर राहणाऱ्या रथात सावित्रीबाईंची वेशभूषा केलेल्या भगिनी, युवती आणि चिमुकल्या मुली विराजमान असणार आहेत. याप्रसंगी विविध पोवाडे आणि क्रांतीगीतांनी संपूर्ण शहर सावित्रीबाईमय होणार आहे. या कार्यक्रमासाठी आयोजन समिती जोमाने तयारी करत आहे. या शोभायात्रेत शहर व परिसरातील महिला, पुरुष, युवक, युवती, शालेय विद्यार्थिनी, कॉलेजचे विद्यार्थी, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते व इतर नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन सार्वजनिक सावित्रीबाई फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.