बुलडाणा, दि. 10 : संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०२३ वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. सर्वसामान्य नागरिकांना पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील महत्व आणि फायदे पटवून देण्यासाठी कृषि विभागामार्फत विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे. त्यानुसार मकरसंक्रांती भोगी सण दरवर्षी राज्यात पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.विविध कार्यक्रमांसोबतच तृणधान्य पिकांचे क्षेत्र, उत्पादन आणि उत्पादकता वाढीसाठी कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. प्रत्येक कृषि सहाय्यक आपल्याकडील गावामध्ये प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्यावर आधारित चर्चासत्राचे आयोजन, तृणधान्य पिकांच्या विविध जाती, त्यांचे लागवड तंत्रज्ञान, तृणधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा, मुलाखती, तृणधान्य पिकापासून बनवण्यात येणारे विविध उपपदार्थ यांची माहिती देण्यात येतील. प्रगतीशील शेतकरी, आहार तज्ज्ञ, विद्यापीठाचे शास्त्रज्ञांना निमंत्रित करण्यात येणार आहे.मकर संक्रांती भोगी हा दिवस पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून उत्साहाने साजरा करावा, असे आवाहन कृषि विभागाचे विस्तार व प्रशिक्षण संचालक विकास पाटील यांनी केले आहे.