मलकापूर:-तालुका प्रतिनिधी
येथील श्रीमती कावेरीदेवी केदारमल अग्रवाल कला व वाणिज्य महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या आचार्य चाणक्य कौशल विकास प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन सोहळा पार पडला.या केंद्रामार्फत डोमेस्टिक डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि जीएसटी असिस्टंट हे दोन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन मलकापूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा आ. चैनसुख संचेती यांच्या हस्ते झाले. आपल्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी कौशल्यवर्धित शिक्षणाचे महत्त्व विविध उदाहरणांसह स्पष्ट केले आणि यश मिळवण्यासाठी सतत प्रयत्न हाच अंतिम मार्ग आहे, असे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य एस. आर. राजपूत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना कौशल्यवर्धित अभ्यासक्रम हा रोजगारक्षम शिक्षणाचा राजमार्ग आहे, असे सांगून या उपक्रमाचा लाभघेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास मलकापूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव अशोक अग्रवाल, व्यवस्थापक सोहनलाल संचेती, संचालक मंडळ सदस्य कमलकिशोर टावरी, खामगाव अर्बन बँकेचे अध्यक्ष विजय पुंडे यांची विशेष उपस्थिती होती. प्रस्तावनेतून इंग्रजी विभागाचे प्रा. श्रीकांत ठाकूर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. संचालन प्रा. डॉ. अलका जाधव यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. उमेश राऊत यांनी व्यक्त केले. या प्रसंगी प्रा. डॉ. राजेश जोशी, प्रा. मंगेश शेकोकार, अधीक्षक प्रतुल कोलते आदी प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाकरिता महाविद्यालयातील प्रवेशित विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.