बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी
मानस फाउंडेशनतर्फे समाजातील एकल महिलांच्या जीवनात प्रकाश टाकण्यासाठी पुनर्विवाहाची संकल्पना राबवली जात आहे. या समाज परिवर्तनाच्या चळवळीत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मानस फाउंडेशनचे अध्यक्ष डी. एस लहाने यांनी केले आहे.विधवा, परितक्त्या व घटस्फोटीत महिलांच्या पुनर्विवाहाची चळवळ बुलढाणा जिल्ह्यात प्रा. डी एस लहाने यांनी रूजविली आहे. मानस फाउंडेशनच्या वतीने सामूहिक पुनर्विवाह सोहळा व परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ एप्रिल रोजी सैनिक मंगल कार्यालय बसस्टँड समोर हा कार्यक्रम पार पडणार आहे. हा सोहळा सत्यशोधक पद्धतीने केला जाणार असून सर्व विधी विधवा घटस्फोटीत महिलांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ८ जोडप्यांची नोंदणी आतापर्यंत झालेली आहे. ४ आंतर जातीय विवाहांचा सुध्दा समावेश आहे. याबाबतची माहिती १० एप्रिल रोजी बुलढाणा येथील पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत मानस फाउंडेशनचे अध्यक्ष डी. एस लहाने यांनी दिली. आतापर्यंत ९० पेक्षा अधिक पुनर्विवाह मानस फाउंडेशन कडून करण्यात आले असून महिलांच्या पुनर्विवाहाची चळवळ राज्यभर उभारली जाणार असल्याची माहितीही लहाने यांनी यावेळी दिली. यावेळी प्रा. शाहिना पठाण, प्रज्ञा लांजेवार, प्रतिभा भुतेकर, मनिषा वारे, पंजाबराव गवई, अॅड. संदीप जाधव, दिनकर पांडे, गौरव देशमुख, गजानन मुळे, किरण पाटील कडूबा सोनुने, महेंद्र सौभागे आदींची उपस्थिती होती.