बुलढाणा : नवतापामुळे तापमान नवनवे विक्रम नोंदवत असतानाच उष्माघाताने एका शेतमजुराचा मृत्यू झाला. संग्रामपूर तालुक्यातील रिंगणवाडी येथे आज ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी तामगाव (ता. संग्रामपूर) पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची आणि मृतक उष्माघाताने दगावल्याची नोंद करण्यात आली.
या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेसह प्रशासकीय वर्तुळ हादरले आहे. सचिन वामनराव पेठारे, असे उष्माघाताने मृत्यू पावलेल्या ४० वर्षीय मजुराचे नाव आहे. तो अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथील मूळ रहिवासी असून सध्या संग्रामपूर परिसरात मजुरीचे काम करीत होता. संग्रामपूर परिसरातील रिंगणवाडी परिसरात आज त्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच तामगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृताचे नातेवाईक अजय संपत पेठारे (३१, रा. जिजामाता नगर, तेल्हारा, जि. अकोला) याने त्याची ओळख पटविली. त्यानेच तामगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सचिन वामनराव पेठारे हा आज पायीच गावाकडे जात होता. मात्र उष्माघाताने तो दगावला, असे तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यतील तापमानात भीषण वाढ होत आहे. नवतापामध्ये याची तीव्रता आणखी वाढली आहे. जिल्ह्याच्या घाटाखालील प्रामुख्याने अकोला जिल्ह्याला लागून असलेल्या तालुक्यात तापमानात झालेली वाढ असह्य ठरत आहे. आजवर उष्माघाताचा बावीस जिल्ह्यावसीयांना फटका बसला आहे. मात्र, उपचारानंतर त्यांना सुट्टी देण्यात आली. आजच्या घटनेत एकाचा मृत्यू झाल्याने तापमानाची भीषणता किती धोकादायक असते हे दिसून आले आहे.