गडचिरोली : नक्षल विरोधी अभियान राबवून परतताना सी – ६० जवानांच्या मार्गावर लोखंडी क्लेमोरने स्फोट घडवून घडवून माओवाद्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र सतर्क जवानांनी हा प्रयत्न हाणून पाडला.
ही घटना ६ जुलै रोजी पहाटे साडेपाच वाजता भामरागड-धोडराज मार्गावर घडली.
माओवाद्यांविरुद्ध सध्या पोलिसांकडून अभियान गतिमान करण्यात आलेले आहे. त्यानुसार भामरागड तालुक्यातील धोडराज परिसरात जवान मोहीम राबवून परतत होते. जवानांवर घातपाताच्या उद्देशाने माओवाद्यांनी आयईडी स्फोटाचा प्रयत्न केला. धोडराज – भामरागड मार्गावरील पुलाजवळ माओवाद्यांनी लोखंडी क्लेमोरने स्फोट केला. यात दोन जवानांच्या हाताला किरकोळ जखमा झाल्या आहेत. जवानांच्या सतर्कतेमुळे माओवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. परिसरात पुढील शोध मोहीम सुरू आहे. दरम्यान, या घटनेने पोलिस अधिक सतर्क झाले आहेत.
का बिथरले नक्षली?
मागील दोन वर्षांत १९ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. शिवाय काही जहाल नक्षल्यांना चकमकीत पोलिसांच्या गोळीचा निशाणा व्हावे लागले. त्यामुळे जिल्ह्यात नक्षल चळवळीची पिछेहाट सुरू आहे. मागील महिन्यात नक्षल नेता नांगसू मनकू तुमरेटी ऊर्फ गिरीधर ऊर्फ बिच्छु याने पत्नी संगीता ऊर्फ ललिता चैतू उसेंडी या दोघांनी आत्मसमर्पण केले. त्यामुळे नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे नक्षली बिथरले आहेत.
नक्षलविरोधी अभियान राबवून परतताना माओवाद्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र जवान सुरक्षित आहेत. परिसरात नक्षलविरोधी अभियान सुरु आहे.
नीलोत्पल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली