गडचिरोली : देशभरात बदलाचे वारे वाहत असताना आजही अनेक गाव खेड्यांमध्ये नागरिकांना मूलभूत सुविधांना मुकावे लागत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भाग असलेल्या भामरागड तालुक्यात हीच स्थिती असल्याने आदिवासींचे मोठे हाल होत आहेत. नदी, नाल्यावर पुल नसल्याने तुडुंब भरलेल्या नदीतून जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागत आहे. येथील दुर्गम वस्तीतील एका महिलेच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह घेऊन गावकऱ्यांनी चक्क तुडुंब भरलेल्या नदीतून प्रवास केला आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
पामुलगौतम नदीवर पूल नसल्याने गावात रुग्णवाहिका जाऊ न शकल्याने मृतदेह चक्क बोटीतून घेऊन जाताना व्हिडिओ मध्ये दिसत आहे. सविता साधू परसा (वय २८) रा.मेडपल्ली असे त्या मृतक महिलेचे नाव आहे. सविता ही मागील अनेक दिवसांपासून अज्ञात आजाराने ग्रस्त होती. तिच्या घरच्यांनी अनेकदा उपचारासाठी विविध ठिकाणी भरती केले. मात्र, तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने मागील एक वर्षांपासून लाहेरी येथे ती आपल्या नातेवाहिकांकडे राहून उपचार घेत होती. अखेर १५ सप्टेंबर रोजी लाहेरी येथे तिचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी लाहेरीवरून १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या मोरडपार (तिचा माहेर) येथे अंत्यविधी करण्याचे ठरविले. मात्र, मोरडपारला जाण्यासाठी कच्चा रस्ता आणि पामुलगौतम नदीवर पूल नसल्याने रुग्णवाहिका जाऊ शकत नव्हती. अखेर नातेवाईकांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने मृतदेह नेण्याचे ठरविले.लाहेरी वरून चिखलातून ट्रॅक्टरच्या साहाय्याने होड्री, लष्कर आणि गोपणार गाठले. गोपणार नंतर मोरडपारला जाण्यासाठी पामुलगौतम नदी ओलांडल्याशिवाय पर्याय नव्हता. अखेर सायंकाळी उशिरा येथे असलेल्या बोटीत मृतदेह ठेवत तुडुंब भरलेल्या नदीतून त्यांना जीवघेणा जलप्रवास करावा लागला. रात्री उशिरापर्यंत तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. मोरडपार हे गाव छत्तीसगड सीमेवर असून या भागातील धिरंगी, आलदंडी आदी गावातील नागरिकांना पावसाळ्यात असाच जीवघेणा जलप्रवास करावा लागतो. होड्री नाल्यावर बेलीब्रिज झाला. मात्र पामुलगौतम नदीवर अजूनही पुलाच्या बांधकामाची प्रतीक्षा आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात अजूनही रस्ते, नदी-नाल्यांवर पूल नसल्याने येथील आदिवासींना पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन जलप्रवास करावा लागत आहे.नुकतेच २७ जुलै रोजी याच तालुक्यातील भटपार येथील मालू केये मज्जी शेती काम करताना घसरून पडल्याने वेदनेने विव्हळनाऱ्या ६७ वर्षीय जखमी पित्याला मुलाने आपल्या मित्राच्या मदतीने खाटेची कावड करून चिखलात तब्बल १८ किलोमीटर तालुका मुख्यालयातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले होते.४ ऑगस्ट रोजी कोरची तालुक्यातील चरवीदंड येथील रोशनी कमरो या २३ वर्षीय गर्भवती महिलेला प्रसूती वेदना होत होत्या. मुसळधार पाऊस सुरू असल्याने चरवीदंड ते लेकुरबोडी या गावादरम्यान असलेल्या नाल्याला पूर होता. नाल्यावर पूल नसल्याने खाटेची कावड तयार करून पुराच्या पाण्यातून मार्ग काढत नातेवाइकांनी दोन किलोमीटरची पायपीट केली. त्यानंतर रुग्णवाहिकेतून कोरची आणि तिथून पुढे गडचिरोलीला पोहोचल्यानंतर रुग्णालयात तिची प्रसूती झाली. मात्र प्रसूतीनंतर बाळ दगावल्याची दुर्दैवी घटना घडली.नुकतेच ७ सप्टेंबर दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे लाहेरीजवळील गुंडेनुर नाल्याला अचानक पुर आला होता. दलसू अडवे पोदाडी या २२ वर्षीय युवकाने आपल्या मित्रांसोबत बोटीच्या साहाय्याने गुंडेनुर नाला ओलांडताना बोट उलटली. मित्र पोहत बाहेर पडला अन् दलसु पोदाडी हा पुराच्या पाण्यात वाहून गेला. पाण्यात वाहून जाताना एक झाड आडवे आले अन् त्या झाडाला पकडून त्याने तब्बल ३६ तास काढले. संकटांनी घेरलेल्या स्थितीत संयम राखला. शेवटी दोर घेऊन गावातील नागरिकांनी त्याला सुरक्षित पुरातून बाहेर काढले. याच महिन्यात अहेरी तालुक्यातील पत्तीगाव येथील व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात जन्मदात्यांनी दोन्ही मुलांचे मृतदेह खांद्यावर घेऊन १५ किलोमीटरची पायपीट केली होती. आता एका महिलेचा मृतदेह बोटीत घेऊन गावकऱ्यांनी तुडुंब भरलेली पामुलगौतम नदी ओलांडताना व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.