राज्यातील प्राचीन मंदिरांना मिळणार नवे वैभव, नऊपैकी तीन मंदिरांसाठी ७१ कोटींच्या निविदाराज्यातील प्राचीन मंदिरांना मिळणार नवे वैभव, नऊपैकी तीन मंदिरांसाठी ७१ कोटींच्या निविदा

Khozmaster
2 Min Read

 पुणे : पाचशेहून अधिक वर्षांपासूनच्या जुन्या जीर्ण झालेल्या प्राचीन मंदिरांचा कायापालट करण्यासाठी राज्यातील नऊपैकी तीन मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) ७१ कोटी रुपयांच्या पाच निविदा काढल्या आहेत. या निविदांना मान्यता मिळाल्यानंतर या मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू होईल. यामध्ये पुणे जिल्ह्यातील कार्ला येथील एकवीरा देवी, बीडमधील पुरुषोत्तमपुरी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर मंदिराच्या कामांचा समावेश आहे.

राज्यातील पाचशेहून अधिक वर्ष प्राचीन असलेल्या मंदिरांना नवे वैभव प्राप्त करून देण्यासाठी राज्य सरकारने दोन वर्षापूर्वी निर्णय घेतला होता. त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सोपविली होती.

या नऊ मंदिरांच्या छत, संरक्षक भिंती तसेच अन्य कामांची पडझड झाली आहे. त्यामुळे अमरावती (लासूर) आनंदेश्वर, गडचिरोली (चार्मोशी) मार्कंडेय शिवमंदिर, पुणे जिल्ह्यातील कार्ला येथील एकवीरा देवी, सातारा जिल्ह्यातील उत्तेश्वर, कोल्हापूर (खिद्रापूर)मधील कोपेश्वर, छत्रपती संभाजीनगरमधील खंडोबा, बीड (माजलगाव) पुरुषोत्तमपुरी, नाशिक (सिन्नर) गोंदेश्वर आणि रत्नागिरी (राजापूर) धूतपापेश्वर या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठीचा समावेश आहे.

लवकरच गती

कार्ला आणि शिरोळ येथील मंदिराची दोन प्रकारची कामे आहेत. त्यात पुरातत्व विभागाच्या अखत्यारीतील कामे आणि मंदिराच्या बाहेरील कामे अशी दोन प्रकारची कामे आहेत. त्यामुळे दोन मंदिरांसाठी प्रत्येकी दोन विविध रकमेच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. कार्ला येथील एकवीरा मंदिरासाठी सुमारे २७ कोटीं खर्चाच्या दोन, तर खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराचे सुमारे २१ कोटी रुपयांच्या दोन निविदांचा समावेश आहे. त्याशिवाय बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी मंदिराचे जतन, संवर्धन, परिसर विकास करणे अंतर्गत ओवऱ्या, नगरखाना, सीमा भिंत, प्रवेशद्वार, तसेच परिसरातील इतर बांधकामांचा निविदांमध्ये समावेश आहे. या तीन मंदिराच्या पाच प्रकारच्या कामांसाठी ७० कोटी ७५ लाख ८८ हजार ८२६ रुपयांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्या निविदांना लवकरच मान्यता मिळाल्यानंतर या मंदिरांचे काम वेगाने सुरू होईल, असे रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले

मार्कंडेय शिव मंदिराचे काम बांधकाम विभागाकडे

दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडेय शिव मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आले आहे. तसेच सिन्नर येथील गोदेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी भारतीय पुरातत्व विभागाची मंजुरी अद्याप बाकी आहे. त्यानंतर त्याच्या कामांची निविदा प्रक्रिया सुरू होईल, असेही सांगण्यात आले आहे. सद्यस्थितीत चार मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. त्यामध्ये पुरुषोत्तमपुरी, धूतपापेश्वर, उत्तेश्वर, आनंदेश्वर या चार मंदिरांची कामे सुरू आहेत, असेही महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *