सोलापूर: सोलापूर लोकसभेच्या उमेदवार म्हणून सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांकडे पाहिलं जातं आहे. काँग्रेस भवनमधून सोलापूर काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रीय काँग्रेसकडे आमदार प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे या दोन्ही नावांची शिफारस करण्यात आली आहे. सुशीलकुमार शिंदे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मंगळवारी सकाळी आले होते. त्यावेळी लोकसभेच्या उमेदवारी बाबत विचारले असता त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी डिसेंबर २०२२ मध्ये काँग्रेस स्थापन दिनाला राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे आगामी सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार कोण असणार याकडे लक्ष लागले होते. काही दिवसांनी काँग्रेस भवनात झालेल्या बैठकीत काँग्रेस आमदार आणि सुशीलकुमार शिंदेच्या कन्या प्रणिती शिंदे यांच्या नावाची शिफारस हाय कमांडकडे करण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी देखील माध्यमांना माहिती देताना प्रणिती शिंदे या लोकसभेच्या उमेदवार असतील असे वक्तव्य केले होते.मंगळवारी २४ ऑक्टोबर रोजी सकाळी सुशीलकुमार शिंदे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आले असता पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, मी राजकारणातून निवृत्त झाल्यासारखा आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी वयाची ऐंशी ओलांडली आहेत. वयोमानानुसार त्यांची तब्येत साथ देत नाही. ऐंशी ओलांडलेले सुशीलकुमार शिंदे यांनी मुलीसाठी कंबर कसली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात त्यांनी गाठीभेटी सुरू केल्या आहेत. दोनच दिवसांपूर्वी शिंदेनी मोहोळ मतदारसंघात जाऊन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजन पाटील कुटुंबाची भेट घेतली. मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा सोलापूर लोकसभा मतदारसंघात महत्वाचा मानला जातो. ऐंशी ओलांडलेल्या सुशीलकुमार शिंदेच्या वाढत्या गाठीभेटीमुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विरोधकांत धडकी भरली आहे.