नागपूर : नोव्हेंबर महिना संपत आला असूनही अद्याप थंडीचा म्हणावा तसा ‘फिल’ आलेला नाही. सध्या बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भातील काही जिल्ह्यांना आठवड्याअखेरीस पावसाचा सामना करावा लागणार असल्याचे संकेत आहेत. यात नागपूरचा समावेश नाही मात्र, नागपुरात ढगाळ वातावरणामुळे तापमानात थोडीफार वाढ होण्याची शक्यता आहे.
सध्या दिवसा व रात्री मोकळे आकाश असल्याने वातावरणात गारवा जाणवतो आहे. विशेषत: रात्री उशिरा आणि पहाटेच्या वेळेस आल्हाद जाणवतो. दरम्यान, गुरुवारी नागपुरात १६.६ अंश इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. किमान तापमान हे सरासरीपेक्षा २.१ अंशांनी अधिक होते.
नागपुरातील नोव्हेंबरमधील सरासरी किमान तापमान हे १४ अंशांच्या आसपास असते. पुढील चार दिवस किमान तापमान १७ अंश सेल्सियसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. परंतु, उद्यापासून वातावरणात बदल होती. विदर्भात २५ व २६ नोव्हेंबर रोजी हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या काळात चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.या काळात शहरातील पावसाचा अंदाज नसला तरीसुद्धा ढगाळ वातावरण राहणार असल्याने तापमानात घसरण होण्याची शक्यता नाही. पुढे २९ नोव्हेंबरपासून मात्र, विदर्भातील तापमानात घसरण होण्याची शक्यता आहे.