भंडारा : दर आठवड्याला १० टक्के परतावा आणि मुंबई व गोवा पर्यटनाच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या ‘माय सिक्युअर लाइफ’ या बोगस कंपनीचा प्रताप तक्रारीनंतर उघडकीस आला आहे.
विशेष म्हणजे या प्रकरणी १३ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकारही उजोडात आला आहे. यामुळे फसवणुकीच्या गुन्ह्याखाली या बोगस कंपनीच्या कथित तीन संचालकांविरुद्ध पवनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंतवणूक केलेल्या रकमेपैकी १० टक्के रक्कम दर आठवड्याला परत करण्याचे आमिष दाखवून ‘माय सिक्युअर लाइफ’ कंपनीच्या योजनेत १३ लाख २५ हजार रुपयांची गुंतवणूक करून मुंबई, गोवा क्रूझ दूर करून देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. ही घटना पवनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. यातील आरोपींमध्ये अनिल चौधरी उर्फ ओंकार सावंत (४७, रा. पंतनगर, पूर्व मुंबई), राजेश रहांगडाले (३८, रा. चिचगाव, ता. गोरेगाव, जि. गोंदिया) आणि उमेश जाधव (४२, रा. ठाणे) यांचा समावेश आहे.
प्रवासाचे आणि १० टक्के गुंतवणुकीचे आश्वासन देऊनही प्रत्यक्षात अनुभव मात्र वेगळा आल्याने आपण फसवलो गेल्याची जाणीव गुंतवणूकदारांना झाली. त्यामुळे प्रवीण मुंडले यांनी पुढाकार घेत पवनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पवनी पोलिसांनी तिघाही आरोपींविरुद्ध वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणी सहायक पोलिस अधिकारी चांदेवार अधिक तपास करत आहेत.
असा घडला प्रकार
या तिघाही आरोपींनी ५ ऑक्टोबर २०२३ रोजी गोव्यातील मडगाव येथे ‘माय सिक्युअर लाइफ’ या नावाने बनावट कंपनी उघडली. या माध्यमातून प्रवास आणि गुंतवणुकीची एक योजना तयार करून या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास दर आठवड्याला १० टक्के रक्कम परत करण्याचे आणि मुंबईला, गोवा कूझ दूर करण्याचे ग्राहकांना आश्वासन दिले. राजेश रहांगडाले व उमेश जाधव यांनी पवनी गाठून प्रवीण मुंडले (३९, रा. शिवाजी चौक, पवनी) व इतरांना विश्वासात घेऊन अधिक लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवले. यासाठी त्यांच्याकडून १३ लाख २५ हजार रुपये उकळले.