महाराष्ट्रातील महत्वकांक्षी प्रकल्प असलेला समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यानंतर मुंबईवरुन थेट नागपूर प्रवास आठ तासांवर येणार आहे. आता पुणे शहराला समृद्धी महामार्गाने जोडण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी पुणे ते शिरुळ दरम्यान 53 किलोमीटर लांब सहा पदरी फ्लायओव्हर उभारण्यात येणार आहे. त्यानंतर अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर माध्यमातून पुणे समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे.
किती येणार खर्च
समृद्धी महामार्गासाठी उभारण्यात येणारा फ्लायओव्हर केसनंद गावातून सुरु होणार आहे. हा मार्ग शिरूरपर्यंत जाणार आहे. या फ्लायओव्हरच्या निर्मितीसाठी 7515 कोटी रुपये खर्च येणार आहे. तसेच फ्लायओव्हार अहमदनगरवरुन समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी अतिरिक्त 2050 कोटी खर्च येणार आहे. यामुळे या प्रकल्पाचा एकूण खर्च 9565 कोटींवर जाणार आहे. पुणे ते समृद्धी महामार्गपर्यंतचा रस्ता 250 किलोमीटर असणार आहे.
महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाची मंजुरी
मंत्रिमंडळाच्या बैठकीत समृद्धी महामार्ग पुणे ते छत्रपती संभाजीनगरपर्यंत जोडण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. पुणे से छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय राजमार्ग आतापर्यंत ‘एनएचएआय’ कडून बनवला जात होता. तो आता ‘एमएसआयडीसी’ कडून तयार केला जाणार आहे. यासाठी एप्रिल महिन्यात ‘एमएसआयडीसी’ सोबत करार झाला होता. या मार्गामुळे केवळ पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान चांगला संपर्क होणार नाही तर या भागातील आर्थिक आणि सामाजिक विकास होणार आहे.
अशी आहे समृद्धी महामार्गाची प्रगती
पीडब्ल्यूडी विभागातील अधिकाऱ्यानुसार, पीडब्ल्यूडी आणि महाराष्ट्र सरकार दोन वर्षांत हा प्रकल्प सुरु करण्यासाठी सर्व उपाययोजना करणार आहे. तसे झाले नाही तर एमओआरटीएच हा प्रकल्प आपल्या हातात घेईल. समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा नागपूर ते शिर्डीपर्यंत झाला होता. त्याचे उद्धघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यानंतर दुसरा टप्पा शिर्डी ते इगतपुरी तालुक्यातील भर्वीरपर्यंत सुरु झाला. मुंबई नागपूर एक्स्प्रेस वेचा तिसरा आणि अंतिम टप्पा २०२४ च्या अखेरीस सार्वजनिक वापरासाठी पूर्णपणे खुला होईल.