कोल्हापूर: गेल्या वर्षीच्या तुटलेल्या उसाला आम्ही ४०० रुपयांच्या दुसऱ्या हप्त्याची मागणी केली होती आता आम्ही तीन पावलं मागे येत आहोत. गेल्या वर्षी तुटलेल्या उसाला शंभर रुपयांचा दुसरा हप्ता द्या, कारखानदारांनी यासाठी तडजोड करू नये असे म्हणत शेतकरी संघटना आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात आज मुंबईत चौथी बैठक झाली. मात्र ती देखील निष्फळ ठरली. यामुळे उद्या राष्ट्रीय महामार्ग रोखून धरून कारखानदारांना हिसका दाखवू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला ते बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते.
यामुळे राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतली असून बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राजू शेट्टी यांनी दुसरा हप्ता ४०० रुपये मिळावा या मागणीवरून आम्ही तीन पावलं मागे घेण्याची तयारी दाखवली. कारखानदारांनी शेतकऱ्यांना दुसरा हप्ता १०० रुपयांचा द्यावा अशी तडजोड केली. मात्र तरीही कारखानदार मागणी मान्य करण्यास तयार नाहीत. जिल्ह्यातील कारखानदारांना आणि सहकारमंत्र्यांना आज रात्री आठपर्यंत मुदत दिली असून मागणी मान्य न झाल्यास उद्या गुरुवारी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरत कारखानदारांना हिसका दाखवू असा इशारा दिला आहे.