हिंडेनबर्गमुळे रद्द केलेला FPO, आता पुन्हा अदानींची ‘ही’ कंपनी उभे करणार १ अब्ज डॉलर्स; जाणून घ्या महत्त्वाची माहिती

Khozmaster
2 Min Read

अदानी समूहाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, समूहातील कंपनी अदानी एंटरप्रायजेस शेअर्स विकून १ अब्ज डॉलर्स उभारण्याच्या तयारीत आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या एका व्यक्तीनं दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबरमध्ये ही शेअर्सची विक्री केली जाऊ शकते.

या पैशातून अदानी समूह आपल्या व्यवसायाला गती देण्याचा प्रयत्न करेल, असं मानलं जात आहे. गेल्याच आठवड्यात अदानी एनर्जीनं पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या माध्यमातून पैसे उभे केले होते.

अदानी एंटरप्रायजेस चार्टर्ड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंटच्या माध्यमातून निधी उभारण्याचा प्रयत्न करेल. रिपोर्टनुसार, लवकरच या मुद्द्यावर गुंतवणूकदारांशीही चर्चा केली जाईल. अदानी समूहानं आयसीआयसीआय सिक्युरिटीज, एसबीआय कॅपिटल मार्केट्स आणि जेफरीज यांना शेअर्स विक्रीसाठी नियुक्त केले आहे.

गेल्या वर्षी आलेला FPO

अदानी एंटरप्रायझेसनं गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये एफपीओची आणला होता. पण नंतर हिंडेनबर्गच्या अहवालानंतर तो मागे घ्यावा लागला. अशा परिस्थितीत कंपनीकडून पुन्हा पैसे उभे करण्याच्या वृत्ताकडे एक मोठं पाऊल म्हणून पाहिलं जात आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणावर अदानी समूहाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

“शेअरविक्री ऑगस्टच्या अखेरीस किंवा सप्टेंबरमध्ये होऊ शकते. अदानी समूहाच्या अधिकाऱ्यांनी या व्यवहाराची माहिती बँकर्सना दिली आहे. बोर्डाने मे महिन्यात दोन अब्ज डॉलरचा निधी उभारण्यास परवानगी दिली,” अशी माहिती या प्रकरणाची माहिती असलेल्या एका व्यक्तीनं रॉयटर्सला दिली.

(टीप – यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *