अकोला:-तालुका प्रतिनिधी
पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवीन वर्षाची सुरुवात होते आणि या दिवशी गुढीपाडवा हा सण साजरा करण्याची प्रथा आहे. गुढीपाडवा हा सण दरवर्षी हिंदू धर्मात चैत्र नवरात्रीच्या प्रतिपदेला साजरा केला जातो. गुढीपाडव्याचा सण महाराष्ट्रात प्रामुख्याने हिंदू नववर्ष किंवा नव-संवत्सर सुरू होण्यासाठी साजरा केला जातो. यंदा ३० मार्च रोजी गुढीपाडवा साजरा करण्यात येणार आहे.या गुढीपाडव्यापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. या दिवशी घरोघरी गुढी उभारून मोठ्या जल्लोषात नववर्षाचं स्वागत केलं जातं. शास्त्रानुसार गुढीपाडवा हा जगातील पहिला दिवसही मानला जातो. असे मानले जाते की या दिवशी ब्रह्माजींनी सृष्टीची निर्मिती केली होती, सूर्य देव जगात प्रथमच उदयास आला होता. दुसरीकडे, पौराणिक कथेनुसार, त्रेतायुगात, भगवान श्रीरामांनी या दिवशी बळीचा वध केला आणि लोकांची त्याच्या दहशतीपासून मुक्तता केली. लोक हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा करतात. त्यामुळेच या आनंदाच्या प्रसंगी घराबाहेर रांगोळी काढली जाते आणि पताका फडकवून विजय साजरा केला जातो. गुढीपाडवा हा महाराष्ट्राचा मुख्य सण आहे. गुढी म्हणजे विजय पताका (ध्वज) आणि प्रतिपदेच्या तिथीला पाडवा म्हणतात. या तारखेला ‘नवीन वर्ष’ असेही म्हणतात. हा दिवस कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये उगादी म्हणून साजरा केला जातो. काश्मीरमध्ये त्याला ‘नवरेह’,मणिपूरमध्ये साजिबू नोंगमा पनबा म्हणतात. दुसरीकडे गोवा आणि केरळमधील कोकणी समाजातील लोक हा संवत्सर पाडोचा सण म्हणून साजरा करतात. सिंधी समाजातील लोक या दिवशी चेटी चांद सण साजरा करतात.या दिवशी मराठी समाजातील लोक घराबाहेर गुढी बांधतात आणि तिची पूजा करतात. गुढी हे समृद्धीचे सूचक मानले गेले आहे. नवीन वर्ष सुख, शांती, समृद्धी आणि सौभाग्य घेऊन येवो या कामनाने गुढीची पूजा केली जाते. महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. घरोघरी गुढी उभारून हिंदू नववर्षाचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं जातं. साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणजे गुढी पाडवा. या दिवसापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. म्हणजेच चैत्र महिन्याची सुरुवात होते आणि नूतन शालिवाहन शकवर्षाचा प्रारंभ होतो.