: विदर्भात दोन दिवसांपासून सुरू असलेली पावसाची संततधार बुधवारी थांबली. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडचा पूर ओसरू लागला. गोंदिया जिल्ह्यातील परिस्थितीही पूर्वपदावर येत असतानाच पुजारीटोला धरणाचे आठ, संजय सरोवराचे चार तर बावनथडी, धापेवाडा आणि गोसेखुर्द प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडण्यात आल्याने भंडारा जिल्ह्यात बिकट स्थिती निर्माण झाली. सुमारे ५० गावांचा संपर्क तुटला. बावनथडी नदीच्या पुरामुळे महाराष्ट्र-मध्य प्रदेशदरम्यानची वाहतूक थांबली. पाल नदीच्या पुरामुळे गडचिरोली-नागपूर मार्गावरील वाहतूक अडकून पडली. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक्तांकडून परिस्थितीचा आढावा घेऊन नुकसानीच्या पंचनाम्यांचे आदेश दिले आहेत.
भंडारा : दोन दिवसांच्या संततधार पावसामुळे विविध प्रकल्पांतून वैनगंगेत पाणी सोडण्यात आल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. मध्यरात्री वैनगंगेने धोक्याची पातळी ओलांडल्याने सुमारे ५०हून अधिक गावांचा संपर्क तुटला. सुरक्षेचा उपाय म्हणून काही कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. तर दुसरीकडे बावनथडी नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने महाराष्ट्राचा मध्य प्रदेशशी संपर्क तुटला आहे.