धर्मवीर २ ‘साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट…’

Khozmaster
5 Min Read
अभिनेता:प्रसाद ओक,क्षितिश दाते,मंगेश देसाई

दिग्दर्शक: प्रविण तरडे
प्रकार/शैली:Documentary, Drama, Politica
lकालावधी:2 Hrs 40 Min
‘साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट…’ असा शंखनाद ‘धर्मवीर २’च्या प्रमोशनला करण्यात आला होता; त्यानुसार अपेक्षित अशी साहेबांच्या कार्यकर्तृत्वाची कथा यावेळी लेखक-दिग्दर्शक प्रविण तरडे आणि निर्माता मंगेश देसाई यानं पडद्यावर रंगवली आहे. ‘साहेब’ म्हणजे कोण? याचा आपला अंदाज खरा असला तरी सिनेमाच्या या दुसऱ्या भागात ‘दोन’ साहेबांची दुधारी गोष्ट पाहायला मिळते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (क्षितिश दाते) यांच्या नजरेतून धर्मवीर आनंद दिघे (प्रसाद ओक) पडद्यावर दिसतात. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘लगे रहो मुन्ना भाई’ या सिनेमांच्या पद्धतीची पटकथेची याची रचना आहे. शिवसेनेचे तत्कालीन सर्वसामान्य कार्यकर्ते आणि शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या स्मरणातील, अनुभवातील, दृष्टांतातील धर्मवीर आनंद दिघे यांची कहाणी यावेळी सांगितली गेली आहे.

पालघरमधील मॉब लिंचिंगमध्ये दोन साधूंची हत्या होते आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे अस्वस्थ होऊन झोपेतून जागे होतात. या बिंदूपासून सिनेमाचा प्रारंभ होतो. जागे झालेल्या शिंदेंना घरातील लाकडी झोपाळ्यावर दस्तुरखुद्द धर्मवीर आनंद दिघे दिसतात. अडचणीच्या प्रसंगात दृष्टांत व्हावा तसे त्यांना होते आणि सुरू होते; हिंदुत्वाच्या अस्तित्वाची, स्वत्वाच्या जिद्दीची आणि संघटनेच्या स्वाभिमानाची गोष्ट; परंतु ती पडद्यावर तुकड्या-तुकड्यात दिसते. पटकथाकार म्हणून प्रविण तरडे यांची खासियत असलेली ‘प्रतिकात्मकता’ यावेळी सिनेमाच्या लेखनात प्रभावीपणे जाणवत नाही. परंतु, ही कमतरता त्यांनी दिग्दर्शक म्हणून भरून काढली आहे. अपेक्षित असा प्रभाव आणि व्यक्तिरेखांचा ‘ऑरा’ पडद्यावर उभा करण्यात ते यशस्वी झाले आहेत. समकालीन आणि तत्कालीन प्रसंगांची गुंफण सफाईदारपणे केली आहे. ‘बिटवीन द लाइन्स’चा अचूक वापर केला आहे. ‘समझने वालों को इशारा काफी है’; अशा पद्धतीचे अनेक प्रसंग यात आहेतधर्मवीर आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे या दोन वेगवेगळ्या कालखंडातील शिवसैनिकांच्या मनातील ‘साहेबां’चं स्थान अधोरेखित करण्याचा प्रयत्न सिनेमा करतो. आनंद दिघे यांच्या ‘हिंदुत्वा’वर आणि शिवसैनिकांच्या ‘स्वाभिमाना’वर तो भाष्य करतो. संकलनाच्या बाबतीत सिनेमाचा पूर्वार्ध काहीसा विस्कळीत वाटतो; परंतु उत्तरार्धात पकड घट्ट होते. विशेषतः शिवसैनिक, त्यांचा स्वाभिमान, आणि दिघे साहेबांचं हिंदुत्वाचं ध्येय त्यातून अधोरेखित केलं जातं. या भागात कथा सशक्तरित्या पुढे जाते आणि प्रेक्षकांना चित्रपट भावनिकरित्या बांधून ठेवतो. ज्यांना राजकीय घडामोडींचं ज्ञान आहे, त्यांना यातील संदर्भ सहज समजतील; मात्र सर्वसाधारण प्रेक्षकांना काही वेळेस कथानकातील बाबी समजणं अवघड होऊ शकतं. त्यामुळे काही प्रसंग त्यांना रटाळ भासण्याची शक्यता आहे..पहिल्या ‘धर्मवीर’मध्ये आनंद दिघे यांचा करारी स्वभाव प्रेक्षकांसमोर आला होता. त्याउलट त्यांची हळवी आणि भावनिक बाजू ‘धर्मवीर २’मध्ये प्रकर्षानं दिसते. हाच भावनिक धागा पुढे एकनाथ शिंदे यांच्या पात्रातून गुंफण्यात आला आहे. दिघे साहेबांचं हिंदुत्व पुढे नेण्याच्या शिंदे यांच्या स्वभावगुणांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. ज्यात अयोध्येतील राम मंदिर, श्री मलंगगड, नाशिक जेलमधील कारावास, शिवसैनिकांचं आमरण उपोषण, सावरकर विचार, नथुराम गोडसे यांच्यावरील नाटक, करोनाकाळ आणि शिवसेनेनं स्वीकारलेला आघाडीचा धर्म; आदी मुद्द्यांवर सिनेमा प्रभावीपणे भाष्य करतो.सिनेमाचं सर्वात मोठं यश म्हणजे कलाकारांची उत्तम निवड. प्रत्येक लहान सहान भूमिकेसाठीही योग्य कलाकार निवडल्यानं पात्रांमध्ये अस्सलपणा जाणवतो. भरतशेठ गोगावले (सुनील तावडे), संजय शिरसाट (सुरेश विश्वकर्मा), महेश शिंदे (समीर धर्माधिकारी), दयनादा चौघुले (हृषिकेश जोशी), अनिल बाबर (विजय कदम), बालाजी किणीकर (राजेश भोसले), शाहजी बापू (आनंद इंगळे), दादा भूसे (अभिजीत खांडकेकर), अब्दुल सत्तार (कमलाकर सातपुते), तानाजी सावंत (अजय जाधव), रविंद्र फाटक (सुहास लखन), प्रताप सरनाईक (सचिन नारकर), महेंद्र थोरवे (मंगेश साळवी), शंभुराज देसाई (अभिजीत थिटे), सचिन जोशी (अक्षय जोशी) या प्रत्येकाचं कास्टिंग चपखल झालं आहे. या सर्व कलाकारांनी त्यांची देहबोली आणि संवादफेक चोख साकारलं आहे. प्रसाद ओक यानं आनंद दिघे यांच्या भूमिकेला आत्मियतेनं न्याय देताना पुन्हा एकदा साहेबांना पडद्यावर जिवंत केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत क्षितिश दाते यानं अप्रतिम कामगिरी बजावली आहे. हे आजवरचं त्यांचं सर्वात उत्कृष्ट काम निश्चितच आहे. सिनेमाची गाणी कल्पकतेनं लिहिली गेली आहेत; परंतु ती पडद्यावर फार परिणामकारक ठरत नाहीत. सिनेमॅटोग्राफर महेश लिमये यानं प्रभावीपणे सिनेमा टिपला आहे, अनेक दृश्य केवळ मंत्रमुग्ध करणारी आहेत.एकूणच, ‘धर्मवीर २’ हा सध्याच्या राजकारणातील अनेक घटनांशी नातं सांगतो आणि स्वाभाविकच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाकडे पहावं लागतं. दिग्दर्शकानं अतिशय सूक्ष्मपणे परंतु ‘हातचं राखून’ चित्रपटाची ‘गोष्ट’ उलगडलेली आहे. चित्रपट काही बाबतीत थोडा कमी पडत असला, तरी त्यात कलाकारांची जबरदस्त कामं आणि राजकीय पार्श्वभूमी यामुळे तो खिळवून ठेवतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही सिनेमाच्या ‘पोस्ट क्रेडिट सीन’मध्ये प्रेक्षकांना दर्शन घडतं. त्यांचा ‘जय महाराष्ट्र!’ प्रेक्षागृहातून बाहेर पडताना मनात नक्कीच घुमत राहतो. संपता संपता ‘धर्मवीर ३’ ची चाहूलही देतो. कारण, पुन्हा एकदा ‘तो’ प्रश्न अनुत्तरितच आहे; ‘साहेब ठीक होते आणि अचानक काय झालं?’

सिनेमा
: धर्मवीर २ मुक्काम पोस्ट ठाणे
निर्मिती : झी स्टुडिओज, साहिल मोशन आर्टस्
कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन : प्रविण तरडे
कलाकार : प्रसाद ओक, क्षितिश दाते, मंगेश देसाई
छायांकन : महेश लिमये
संकलन : मयूर हरदास
दर्जा : ३.५ स्टार

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *