अकोला:-जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी साहित्य लिहिणाऱ्या साहित्यिकांची संख्या ही हजारोंच्या संख्येत आहे, मात्र कोणत्याही साहित्यिकांची माहिती एकत्रितपणे कोठेही संग्रहित, संपादित केलेली आजवर दिसली नाही. माझी अशी इच्छा आहे की, प्रत्येक साहित्य संघाने संपूर्ण साहित्यिकांची किंवा आपापल्या साहित्य संघातील साहित्यिकांची यादी, त्यांचा संपूर्ण परिचय व त्यांचे छायाचित्र यांसह संग्रहित करून तशा प्रकारचा अॅप निर्माण करून ते जनमानसासाठी खुले करण्यात यावे, म्हणजे प्रत्येक साहित्यिकाला त्या माध्यमातून नवनवीन संधी उपलब्ध होतील, आणि त्यांना त्या संधीचे सोने करता येईल, असे प्रतिपादन दहाव्या राज्यस्तरीय शुभम मराठी बाल, कुमार, युवा व नवोदित साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष प्रख्यत वन्हाडी कवी, साहित्यिक शिवलिंग काटेकर यांनी व्यक्त केली आहे.ते शुभम मराठी साहित्य मंडळ आणि शेतकरी वाडा, बहादुरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अकोला जिल्ह्यातील शेतकरी वाडा या बहादूरा गावातील निसर्गरम्य ठिकाणी झालेल्या दहाव्या राज्यस्तरीय शुभम मराठी बाल, कुमार, युवा व नवोदित साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी धर्मवीर 2 चित्रपट फेम प्रख्यात बालकलाकार अथर्व मोटे यांच्या शुभहस्ते या साहित्य संमेलनाचे उद्घाटन अतिशय आनंदात, उत्साहात व भरगच्च उपस्थितीत करण्यात आले आहे. याप्रसंगी व्यासपीठावर अभिनेते, लेखक डॉ. तुषार बैसाणे, प्रख्यात विचारवंत तथा लेखक प्राचार्य संदीप काळे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संदीप पाटील, विनोदी कवी किशोर बळी, प्रसिद्ध लेखिका तथा अभिनय गुरु प्रा. दीपाली आतिश सोसे, अभ्यास मंडळ सदस्य प्रा. ममता इंगोले, तसेच स्वागताध्यक्ष विठ्ठलराव माळी प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी सर्व मान्यवरांची समायोचित भाषणे झाली. प्रत्येकाने आपल्या भाषणांमधून साहित्य, माणूस आणि ग्राम संस्कृती या संदभार्तील आपले विचार व्यक्त केले. साप्ताहिक वऱ्हाड संमेलन विशेषांक मान्यवरांच्या शुभहस्ते प्रकाशित करण्यात आला. तसेच तरुणाई फाउंडेशन या संस्थेचे विविध पुरस्कार सुद्धा देण्यात आले. उद्घाटन सत्राचे अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन निवेदक सचिनकुमार तायडे यांनी तर आभार प्रदर्शन दीपक माहीतकर यांनी तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शुभम चे सचिव संदीप देशमुख यांनी केले.या साहित्य संमेलनाला प्रसिद्ध समाजसेवक प्रा. डॉ. संतोष हुसे, राष्ट्रीय पत्रकार संघटनेचे अध्यक्ष संजय. मा देशमुख, वऱ्हाड लेखक पुष्पराज गावंडे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष शरद वानखडे यांच्यासह विविध क्षेत्रातील गणमान्य विभूतींनी या साहित्य संमेलनाला सदिच्छा भेट देऊन सक्रिय सहभाग घेत विचारांची देवाणघेवाण केली. उद्घाटनानंतर कवयित्रींचे कवी संमेलन, खुले कवी संमेलन, परिसंवाद आणि समारोप सत्र पार पडले. या सत्रांमध्येही मान्यवरांनी आपले विषयानुरूप विचार व कविता सादर करून उपस्थित रसिक प्रेक्षकांच्या आनंदात भर घातली.या संमेलनाला महाराष्ट्रभरातून अलका बोर्ड, विद्या बनाफर, अनिता घाटोळ, धीरज चावरे, पंजाबराव वर, नारायणराव अंधारे, वासुदेवराव खोपडे, अनिल डायलकर, तुळशीराम बोबडे, नितीन वरणकार, मिलींद इंगळे आदि कवींनी आपल्या कविता सादर केल्या. ग्रामीण भागात भरगच्च गर्दीत आणि शेतकरी वाड्यासारख्या निसर्गरम्य ठिकाणी झालेल्या साहित्य संमेलनाने व वनभोजनाने एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याची चर्चा समारोपीय सत्रानंतर संमेलन स्थळी लोक व्यक्त करीत होते. समारोपीय सत्राचे सूत्रसंचालन राहुल भगत यांनी तर आभार प्रदर्शन संस्थापक, अध्यक्ष आतिश सोसे यांनी केले.